मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनेक नेते, मंत्री गाठी-भेटी, बैठक घेत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटी वाढत असल्याने, ठाकरे बंधुंची युती होणार का? अशी चर्चा रंगू लागली. मातोश्री बंगल्यावर येऊन आज राज ठाकरेंनी अचानक उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 2:30 वाजता राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर गेले आणि 3:10 वाजता बाहेर आले. जवळपास 40 मिनिटे राज ठाकरे मातोश्री बंगल्यावर होते. त्यामुळे, चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे बंधुंमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अशातच, एक मोठी अपडेट समोर आली आहे. खासदार संजय राऊतांच्या नातवाच्या बारश्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले. यादरम्यान, ठाकरे बंधुंनी एकमेकांशी हसत-खेळत संवाद साधला. यावेळी राज ठाकरे खासदार संजय राऊतांसोबत गप्पा मारताना आणि हसतानाही दिसले. संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सचिन अहिर, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. यादरम्यान, ठाकरे बंधू एकत्र कार्यक्रमातून बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमातून बाहेर पडताना उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा अदित्य ठाकरेही उपस्थित होते. यावेळी, रश्मी ठाकरे आणि अदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना निरोप दिला.
हेही वाचा: Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची विरोधकांवर बोचरी टीका; म्हणाले, 'औरंगजेबांच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांना...'
काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यादरम्यान, अशी चर्चा सुरू होती की, उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना आमंत्रित करणार का? याची सर्वत्र चर्चा सुरू होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दसरा मेळाव्याबद्दल विधान केले होते. 'आगामी दसरा मेळाव्यात तुम्हा सर्वांना चांगली बातमी मिळेल. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते', अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली होती.
यावर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित केले जाईल की नाही हे माननीय उद्धव ठाकरे ठरवतील. यावर मी किंवा इतर कोणीही मत व्यक्त करणे योग्य नाही आणि सध्या तरी असे होण्याची शक्यता मला दिसत नाही. दोन्ही पक्ष वेगळे आहेत, दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे असतात. कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहतात ते स्वतंत्रपणे होत आहेत. पण नक्कीच भविष्यात राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यात सहमती झालेली आहे'. अशातच, ठाकरे बंधूंची युती कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.