मुंबई : आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसेला सोबत घेण्याचे संकेत भाजपाच्या नेत्यांनी याआधी दिले असले तरी भाजपाची निवडणूक संदर्भातील कोणताही ऑफर मनसे स्वीकारणार नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर राज यांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मनसे भाजपासोबत जाणार किंवा मनसे पक्षाची धोरणं बदलणार अशा पक्षाच्या भूमिकेबाबत निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे राज यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहेत. भविष्यात मनसे पक्ष कोणासमोरही लाचर होणार नाही, असा विश्वास राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भविष्यात मनसेला सोबत घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मनसे भाजपासोबत पालिका निवडणुका लढवणार अशी राजकीय चर्चा सुरू झाली, त्यावर राज यांनी आपण कोणासोबत जाणार नसल्याचे सांगितले.
हेही वाचा : विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सज्जड दम
पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्या तरी पक्षाचं काम, भूमिका सातत्याने लोकांसमोर मांडा असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पक्षाची भूमिका न बदलण्याबाबत ठाम राहणाऱ्या राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसाठी पक्षाची आचारसंहिता लागू करणार असून त्याप्रमाणेच पदाधिकाऱ्यांनी वागण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
मागील अनेक निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचा आलेख सतत घसरता राहिला आहे. आता पुन्हा मनसे पालिका निवडणुकीत आशादायक कामगिरी करणार असल्याचा विश्वास राज यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. मनसेची निवडणूक आचारसंहिता कशी असेल आणि ती लागू झाल्यानंतर मनसे निवडणुकीत यशस्वी कामगिरी करू शकेल का? मनसेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही, आता या निवडणुकीत मनसे काय कामगिरी करते याकडे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज यांनी अन्य पक्ष त्यांच्या कारकिर्दीत कसा पराभूत झाला होता याची उदाहरणे पदाधिकाऱ्यांना देत त्यांना निवडणूक जिंकण्याचा विश्वास दिला.
हेही वाचा : महाकुंभात इंटरनेटवर व्हायरल होणारी मोनालिसा चित्रपटात भूमिका साकारणार
राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्याचा मंत्र दिला असला तरी मागील अनेक निवडणुकीतील पक्षाची कामगिरी पाहता आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचे इंजिन नक्की धावणार का? पक्षाला स्वबळाच्या जोरावर यश मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मिळालीच नाहीत.