मुंबई: शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येत्या 12 नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार, आशिष शेलार, अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड हे नेते उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. याच कार्यक्रमानंतर, गरवारे क्लबमध्ये सुमारे 1 तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर, आव्हाडांनी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
या सलग बैठकींमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीसाठी नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. मागील निवडणुकीतही शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या गटांनी ऐनवेळी एकत्र येऊन अनपेक्षित निकाल लावला होता. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीतही अशाच प्रकारची राजकीय डावपेचांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: CM Fadnavis On Bangladeshi Immigrants : राज्यात बांग्लादेशी घुसखोरांवर लगाम; फडणवीस सरकारची मोठी कारवाई
दरम्यान, या सर्व घडामोडींमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियममध्ये नव्याने विकसित एमसीए क्लब मेंबर्स लाऊंजचे उद्घाटन केले. अत्याधुनिक आणि वातानुकूलित या लाऊंजचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. येथे प्रीमियम हॉस्पिटॅलिटी सुविधा उपलब्ध असून, क्लब मेंबर्सना सामन्यांचा आनंद आधुनिक आणि आरामदायी वातावरणात घेता येणार आहे. उद्घाटनावेळी बोलताना शरद पवार यांनी मुंबई क्रिकेटच्या समृद्ध परंपरेत क्लब सदस्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच माजी भारतीय महिला कर्णधार डायना एडुल्जी यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ वानखेडे स्टेडियमचा एक भाग त्यांच्या नावाने करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.