मुंबई : महायुतीचा शपथविधी आज 5.30 वाजता होणार आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदारांकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी केल्यानंतर शिंदे आजा साडेपाच वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षा बंगल्यावर गेले होते. उपमुख्यमंत्रीपद शिंदे यांनी घ्यावं यासाठी सर्व आमदारांनी शिंदेंची मनधरणी केली. शिंदेंची भेट घेण्यासाठी उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, आशिष जयस्वाल आणि इतर आमदार उपस्थित होते. आमदारांकडून केलेल्या मनधरणीनंतर शिंदे यांचं ठरलं. एकनाथ शिंदे आज 5.30 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनावर पत्र घेऊन गेले आहे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असले तरीही गृहखात्याच्या बाबतीत असणारा पेच अद्याप कायम आहे. शिंदे दिल्लीतील बैठकीनंतर गृहखात्याच्या दाव्यावर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जरी आज एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तरी त्यांचे आमदार शपथ घेतील का ? प्रश्न कायम आहे.
शिवसेनेचे आमदार आज शपथ घेतील?
आज 5.30 वाजता एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. परंतु शिवसेनेचे बाकी आमदार 11 तारखेपर्यंत शपथ घेतील असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी केला आहे. शिवसेनेला किती मंत्रीपदं मिळतील यावर चर्चा आहे. त्यामुळे आज शिवसेनेचे आमदार शपथ घेणार नसल्याची राजकीय चर्चा आहे.