कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज, शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आतापर्यंत 21 जणांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. यातील 20 अध्यक्ष हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते. तर 2019 साली शौमिका महाडिक यांच्या रूपाने भाजपने पहिला अध्यक्ष केला. परंतु एकाचवेळी जिल्ह्यातून सहा आमदार निवडून देणाऱ्या तत्कालीन शिवसेनेला अजूनही अध्यक्षपदाला गवसणी घालता आलेली नाही. यंदा शिंदेसेनेचे हे उद्दिष्ट असेल. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर प्रामुख्याने ही जबाबदारी असेल. दिनकरराव यादव, बाळासाहेब माने, दिनकरराव मुद्राळे, बाबासाहेब पाटील-सरूडकर, शंकरराव पाटील-कौलवकर, शामराव पाटील-कोडोलीकर, प्रकाश आनंदराव पाटील, बाबूराव हजारे, नंदाताई पोळ हे सर्व 1998 पर्यंतचे अध्यक्ष काँग्रेसचे होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पुष्पमाला जाधव, रामचंद्र गुरव, आण्णासाहेब नवणे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाले. तर नंतर पुन्हा डी. सी. पाटील, नानासाहेब गाठ, यशोदा कोळी, संजय मंडलिक, उमेश आपटे, विमल पाटील, बजरंग पाटील, राहुल पाटील यापैकी गाठ वगळता सर्व काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रत्येक वेळी पाठिंबा देणारे बदलत राहिले.
हेही वाचा : Zilla Parishad Elections 2026: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोठा बदल; मार्करला रामराम, मतदारांच्या बोटावर पुन्हा शाई
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या महायुतीमुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने 2019 च्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे या निवडणुकीत उतरला होता. महादेवराव महाडिक यांनी गरज पडेल त्या ठिकाणी त्यांच्या ताराराणी आघाडीचेही उमेदवार उभे केले होते. अमल महाडिक यांना या अध्यक्षपदाने दिलेली हुलकावणी महाडिक यांना बोचली होती. त्यामुळे त्यांनी कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळवायचे, यासाठी जोडण्या घातल्या होत्या. परिणामी, शौमिका यांचे नाव पुढे आले.
भाजपच्या शौमिका यांना अध्यक्ष करण्यासाठी ऐन मतदानावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही सदस्य गैरहजर राहिले. अपक्ष एका महिला सदस्यानेही महाडिक यांना पाठिंबा दिला आणि भाजपचा पहिल्या जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान शौमिका यांना मिळाला. परंतु हेच गणित नंतर बदलले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, त्यातील अनेकजण प्रामुख्याने शिवसेनेचे सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि पुन्हा अध्यक्ष करण्यात काँग्रेसला यश आले.
जिल्ह्यात 12 तालुके आणि 12 पंचायत समिती, 2 महानगरपालिका, 10 नगरपालिका आणि 1,029 ग्रामपंचायती आहेत.
उपविभाग आणि तालुका -
पन्हाळा - पन्हाळा, शाहूवाडी
इचलकरंजी - शिरोळ, हातकणंगले
करवीर - करवीर, गगनबावडा
राधानगरी - राधानगरी, कागल
भुदरगड - भुदरगड, अजरा
गडहिंग्लज - गडहिंग्लज, चंदगड