Saturday, February 08, 2025 12:24:23 AM

Uday Samant
....तर आम्ही कुणीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही

आझाद मैदानावर अवघ्या काही तासांतच शपथविधी होणार असताना सामंतांचे खळबळजनक वक्तव्य....

तर आम्ही कुणीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानावर अवघ्या काही तासांतच शपथविधी होणार आहे. नुकतीच उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर आम्हीही स्वीकारणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य सामंत यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत भरत गोगावले आणि संजय शिरसाट देखील उपस्थित होते.

आम्ही कोणी उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. शिंदेंना डावलून कुणी काही केल्यावर आम्ही गप्प बसणार नाही. नेता म्हणून आम्ही एकनाथ शिंदेंना मानतो अशी ग्वाही सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  

एकनाथ शिंदे शपथ घेणार का?

एकनाथ शिंदे शपथ घेणार का? याबाबत संभ्रम कायम असल्याचे चित्र एकंदरीत दिसत आहे. आमचं राजकीय करियर शिंदेंच्या हातात आहे. थोड्याच वेळात  एकनाथ शिंदे भूमिका मांडणार असल्याचेही सामंतांनी सांगितले आहे. शिवसेनेची निमंत्रण पत्रिका शासकीय नमुन्यानुसार आहे. एका तासात शिंदे भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.    

 

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव नाही

महायुती सरकारचा शपथविधी आज 5.30 वाजता संपन्न होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील का ? असा प्रश्न संपूर्ण राज्याला पडणार आहे. कारण शिंदेंनी अद्यापही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यातच उदय सामंत यांनी शिंदे एका तासात भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. शपथविधीला अवघे काही तास उरले असताना अजूनही शिंदेनी भूमिका मांडली नसल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेची सर्वत्र चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांच नाव नाही. पत्रिकेत शिंदेंचं नाव नसणे ही अजब गोष्ट आहे.

 

 

 


सम्बन्धित सामग्री