मुंबई- शिवसेना आमदार उदय सामंत यांनी ठाकरे गट आणि काँगेसवर कडक शब्दात टीका केली आहे. 'हिंदुत्व आणि ठाकरे गटाचा काहीही संबंध नाही' असे विधान सामंत यांनी केले. काँग्रेसविषयी बोलताना ते म्हणाले 'महाराष्ट्र आणि बेळगाव सीमेवरील वाद अनेक वर्ष सुरु आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पुढाकार घेतला गेला जातो, पण कर्नाटकात काँग्रेसची हिटलरशाही चालू आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या लोकांवर बंदी घातली नाही, पण कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील जनतेवर बंदी घातली आहे आणि कर्नाटकात काँग्रेस सरकार आहे'. पुढे सामंतांनी आश्वासन देखील दिलं की 'काल आम्ही ''महाराष्ट्र एकीकरण समितीच्या'' लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा शिंदेसाहेब सांगतील त्यांच्यासोबत आम्ही बेळगावात जाऊ'.
पुढे सामंत म्हणाले 'कर्नाटक सरकारला आम्ही नळ पाणी योजनेसाठी अनुमती दिली. गेल्या अडीच वर्षाच्या काळात अनुदान देखील देण्यात आलं'. ह्या मुद्यावर देखील त्यानी काँग्रेस हिटलरशाही करत आहे असे अधोरेखित केले. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर बोलताना ते म्हणाले 'सीमेवरचा भाग महाराष्ट्रात यावा असं तेथील नागरिकांचा प्रयत्न आहे आणि या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात केस देखील सुरु आहे.'
मुंबई - गोवा महामार्गाविषयी बोलताना सामंत म्हणाले 'मुंबई - गोवा महामार्ग प्रकरणात गडकरी यांना भेटलो आहे. मुंबई - गोवा महामार्गाचं लवकरच काम सुरु होईल.' मुंबई - गोवा महामार्गाचं काम हे गेले 17 वर्ष सुरु आहे पण अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही. या विषयावरून कोकणवासीयांनी अनेकदा नाराजी प्रकट देखील केलेली आहे.