सातारा : सातारा जिल्ह्याचा राजकारणात नेहमीच मोठा दबदबा राहिला आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते पृथ्वीराज चव्हाण, शरद पवारांनी सातारा जिल्ह्याचे राजकारण नेहमीच वलयांकीत ठेवलं आहे. याशिवाय सातारची गादी हा ऐतिहासिक मुद्दाही नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशा या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी चार मतदारसंघात कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. सातारा जिल्ह्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारत मविआचं पानीपत केलं आहे. त्यामुळे या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाकडे असणार? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
आठही मतदारसंघावर महायुतीचं वर्चस्व
सातारा - शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
माण - जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर - मनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिण - अतुल भोसले (भाजप)
पाटण - शंभूराज देसाई (शिवसेना)
कोरेगाव - महेश शिंदे (शिवसेना)
फलटण - सचिन पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
वाई - मकरंद पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
हेही वाचा : 'मत्स्योद्योग-बंदर व्यवसायातून कोकणाचा विकास साधणार'
पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी कशी?
पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. साताऱ्याच्या राजघराण्याला तिसऱ्यांदा मंत्रीपद मिळालं आहे. शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील दिवंगत अभयसिंहराजे भोसले साताऱ्याचे पालकमंत्री होते. भाजपाचे चार आमदार जिल्ह्यातून विजयी झाल्याने भाजपाचे वर्चस्व आहे.शिवेसेनेचे शंभूराजे पालकमंत्री पदासाठी सर्वाधिक उत्सुक आहेत. एकनाथ शिंदे यांचा हा जिल्हा असल्याने देसाईंसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.मकरंद पाटील हे चौथ्यांदा विजयी असल्याने त्यांच्यासाठी अजित पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
मंत्रिमंडळात चारही कॅबिनेट मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली आहेत. पालकमंत्री पदाचा मान छत्रपतींच्या वारसदारांकडे असावा, अशी एक मागणी सातारकरांची आहे. जयकुमार गोरे अन्य पक्षातून भाजपात येवून त्यांना भाजपाने मंत्रिपद दिलं आहे. शंभूराज देसाई हे शिवसेनेचे हेवीवेट नेते मानले जात असल्याने त्यांच्या पदासाठीही अनेकजण आग्रही आहेत. तर राष्ट्रवादीचे मकरंद पाटील चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद घेवून साताऱ्यतील आपले राजकीय वजन वाढवण्याकडे अजित पवार यांचा कल आहे. शरद पवार यांच्या गटापुढे आव्हान उभं करणयासाठी अजित पवारांना येथे पालकमंत्रिपद हवं आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेअंती ही माळ कोणाच्या गळात पडणार याची राज्याच्या राजकारणात उत्सुकता आहे.
साताऱ्यात चार मंत्रीपद देऊन महायुतीने चैतन्य निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असताना साताऱ्यात महायुती जोरदार यश मिळवले आहे. पालकमंत्रीपद मिळावे यासाठी महायुतीत तिनही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. साताऱ्याचे माजी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केला तर त्यांना पालकमंत्रीपद मिळू शकते. अजित पवार आपला बालेकिल्ला राखण्यासाठी पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न करतील. परंतु संख्याबळा विचार केला तर भाजपाला पालकमंत्रीपद मिळू शकते. भाजपा साताऱ्यांच्या पालकमंत्रीपदासाठी राज घराण्याला प्राधान्य देईल आणि शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री होतील अशा शक्यता आहे.