Wed. Apr 14th, 2021

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांचा नवा चित्रपट ‘पोरगं मजेतय’

आपल्या मातीतले, रोजच्या जगण्यातले विषय दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘रिंगण’,‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून आजवर मराठी रुपेरी पडद्यावर आणले. उत्तम कथाविषय आणि तितकेच उत्तम कलाकार-तंत्रज्ञ यांची सांगड घालून मकरंद माने पुन्हा एका नव्या कलाकृतीसह सज्ज झाले आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ हा त्यांचा आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मधील मराठी चित्रपट विभागामध्ये या चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मानवी भावभावना, नातेसंबंध याविषयीच्या कुतूहलातून त्याच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आजवर रुपेरी पडद्यावर आले आणि प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. वडिल आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलगडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे.

आपल्या अवतीभवती घडणारी अगदी साधी, सोपी सरळ गोष्ट तेवढ्याच प्रभावीपणे दिग्दर्शकाने मांडली आहे. बाप लेकाच्या नात्याचा हा भावनिक प्रवास प्रत्येकालाच समृद्ध करणारा अनुभव असेल, असा विश्वास राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक मकरंद माने व्यक्त करतात.

दिग्दर्शक मकरंद माने यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव ‘पोरगं मजेतय’ असं आहे तर लॉकडाउनमध्येच या चित्रपटाचे चित्रीकरणसुद्धा पूर्ण झाले होते. लॉकडाउनमध्ये चित्रीकरण पूर्ण करणारा हा ‘पोरगं मजेतय’ पहिला चित्रपट ठरला आहे. ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *