Wed. Dec 8th, 2021

महापूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिलासा

महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शेतीच्या नुकसानाचे पंचनामेही ४८ तासांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात पावसामुळे १२० जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. महापुरामुळे राज्यात विविध भागात शेतीचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठीच्या या महत्वाच्या निर्णयामुळे महापूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी केंद्र सरकारतर्फे कोकण आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात पुराच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची माहिती घेतली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सातत्याने राज्य सरकारसोबत संपर्कात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीआरएफला तत्काळ निर्देश देत अतिरिक्त पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. रायगडमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना २ लाख रूपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *