Wed. Oct 5th, 2022

प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांची धामधुम सुरू झाली आहे. राज्यसभेत दणक्यात विजय मिळवल्यानंतर आता भाजपने विधानपरिषदेसाठीही फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपने आपले ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. या सहाही जागा भाजप जिंकेल, सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपकडे असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. “मैत्रीमध्ये चर्चा न झालेली चांगली असते. निश्चतपणे राजसाहेब मला सहकार्य करतील याची मला खात्री आहे”, असं राज ठाकरेंच्या घराबाहेर पडताच प्रसाद लाड म्हणाले. तसेच, ‘राज ठाकरे आणि माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे’, वाढदिवशी ते कोणालाही भेटणार नाहीयेत. म्हणून आज मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो”, असंही त्यांनी सांगितलं.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसला ही निवडणूक बिनविरोध पार पाडायची आहे. मात्र, मविआची अद्याप कुठलीही रणनिती ठरलेली नाही. त्यामुळे आता कोणीही उमेदवार मागे घेईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे ही निवडणूकही चुरशीची ठरणार हे जवळपास निश्चित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.