Tue. Jun 28th, 2022

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

राज्यात नागरिक उन्हाच्या कडक झळा सोसत असताना दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. उकाड्याने त्रस्त नागपूरकरांसाठी गुरुवारची सकाळ दिलासादायक ठरली. नागपूर जिल्ह्यातील बहुतेक भागात रात्री चांगला पाऊस झाल्याने सकाळपासून वातावरणात गारवा निर्माण झाला असून दिवसभरातील तपमान घसरले आहे. मात्र, रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कळमना बाजार परिसरात शेतकऱ्यांचा ठेवलेला माल खराब झाला.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरासह तालुक्यात गुरुवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या काही भागात उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. सांगलीतही अवकाळी पावसाची हजेरी नोंदवली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे द्राक्ष बागेला फटका बसणार आहे. सांगली जिल्ह्याच्या विटा खानापूर, कडेगाव मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये तसेच जत तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास हा पाऊस जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह बरसला.

गुरुवारी नांदेड जिल्ह्यात अचानक वातावरण बदलले. ढग दाटून आले आणि वादळीवाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडू लागला. नांदेडसह अर्धापूर, हदगाव, मुदखेड परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. या मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. या पावसामुळे काढणीला आलेल्या भुईमूग आणि सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता बळीराजाने वर्तवली आहे. जालन्यात पावसाची भुरभुर दिसून आली. अर्ध्या तासापासून सुरु झालेल्या पावसाने झाला. उकाड्याने त्रासलेल्या नागरिकांना काहीसा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पंढरपूर शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी

पंढरपूर शहरासह तालुक्यात दुपारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी आकाशात काळेकुट्ट ढग निर्माण झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. तालुक्याच्या काही भागात उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.