Thu. Jan 20th, 2022

रुग्णालयाच्या उद्घाटनावरून पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जीं यांच्यात कलगीतुरा

बंगालमधील रुग्णालयाच्या उद्घाटनावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमने-सामने आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या दुसऱ्या कॅम्पसचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केले. मात्र यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जुंपल्याचे चित्र दिसले. पंतप्रधानांनी आज ज्या संस्थेचे उद्घाटन केले त्याचे उद्घाटन आपण यापूर्वीच केल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड आले आहे.

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, तुम्ही ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करत आहेत या रुग्णालयाचे मी याआधीच उद्घाटन केले आहे. चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालय राज्याशी संबंधित असल्यामुळे कोरोना काळात आम्ही या रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. तसेच या रुग्णालयाला आम्ही कोविड सेंटर केले होते. आणि याचा आम्हाला फार उपयोग झाला असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

तसेच त्या म्हणाल्या, राज्य सरकार कॅन्सर रुग्णालयासाठी २५ टक्के निधी देत आहे. राज्य सरकारने या रुग्णालयासाठी ११ एकर जमीन दिली आहे. त्यामुळे जनतेचा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *