पंतप्रधान मोदींची नेदरलँडच्या पंतप्रधानांशी चर्चा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. रशियाचा युक्रेनवर तीव्र लढा सुरूच असून सर्वत्र जगात खळबळ उडाली आहे. दरम्यान, युक्रेनवरील संकटाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलॅंडचे पंतप्रधान मार्क रुटे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आहे. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी मानवी संकटावर चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शत्रुत्व संपवण्याच्या, संवाद आणि शांततेच्या मार्गावर परतण्याचे आवाहन केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मार्क रुटे यांना संघर्षातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे तसेच नागरिकांना औषधांसह मदतीची माहिती दिली आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी एप्रिल २०२१मध्ये रुटे यांच्यासोबत झालेल्या परिषदेची आठवण केली.
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्सकी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरुप परत आणण्याबाबत चर्चा केली. तर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी ट्विट करत भारताचे आभार मानले आहेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिल्याचे वोलोदिमिर जेलेन्स्की यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.