Wed. Jan 19th, 2022

4 पदव्या 8 पदविका… जेलमध्ये ‘त्याने’ पूर्ण केले 12 अभ्यासक्रम!

बी.ए. (अर्थशास्त्र),

बी.ए. (राज्यशास्त्र),

एम.ए. (अर्थशास्त्र),

एम. ए. (राज्यशास्त्र),

डिप्लोमा इन फिनान्शियल मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन आंत्रप्युनरशिप मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट,

डिप्लोमा इन बॅंकिंग,

डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल मॅनेजमेंट

ही पदव्यांची लांबलचक जंत्री एखाद्या शिक्षणतज्ज्ञाची आहे, असं वाटेल. पण नाही. ही पदव्यांची मालिका आहे ती चक्क एका कैद्याची. आपल्या शिक्षेच्या कालावधीमध्ये शिक्षणाची कास धरणाऱ्या जन्मठेपेच्या कैद्याने एक, दोन नव्हे तर तब्बल चार पदव्या आणि आठ पदविका असे बारा अभ्यासक्रम तुरुंगातून पूर्ण केले आहेत. आपल्या जिद्दीच्या बळावर तुरुंगातील शिक्षेचा कालावधी शिक्षणामध्ये सत्कारणी लावणाऱ्या खेड तालुक्‍यातील या कैद्याचं नाव आहे सतीश मुरलीधर शिंदे …

 


 

शिक्षेकडून शिक्षणाकडे…

राजगुरुनगर येथे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर सामान्य शेतकरी कुटुंबातील सतीश शिंदे यांनी उपजीविकेसाठी 1994 मध्ये मुंबईची वाट धरली.

मुंबईत नोकरी करताना ओळखीतून महाड येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे ‘साइट सुपरवायझर’ म्हणून काम मिळालं.

एक दिवस त्या बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराला गाडीतून आणण्यासाठी त्यांना पाठविलं.

तो भागीदार आणि त्याच्या पत्नीला गाडीतून घेऊन येत होते.

त्यावेळी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने मारेकऱ्यांच्या मदतीने भागीदाराचा आणि त्याच्या पत्नीचा खून केला.

मात्र, या कटात सहभागाचा आरोप ठेवून अटक, खटला प्रक्रिया होऊन वयाच्या 25 व्या वर्षी शिंदे यांना जन्मठेप झाली.

4 वर्षे 2 महिने 10 दिवस त्यांना कल्याण आणि अलिबाग तुरुंगामध्ये अंडर ट्रायल काढावे लागले.

त्याठिकाणी या परिस्थितीतही योग्य काहीतरी करायचे, असं त्यांनी मनोमन ठरवलं आणि जिद्दीने शिक्षणक्षेत्रात झेप घेतली.

जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होऊन 17 जून 2007 रोजी अलिबागहून शिंदे यांची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात झाली.

21 जूनला ते कारागृहांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतात.

त्यावर्षी फर्स्टक्‍लास फर्स्ट उत्तीर्ण झाले.

2008 मध्ये ते अर्थशास्त्रात बी.ए. झाले.

अर्थशास्त्र विषय घेऊन त्यांनी अभ्यास सुरू केला.

त्यांनी एम.एस्सी. व्हावे, असे त्यांच्या मामांचे स्वप्न होतं.

ते शक्‍य नव्हतं, पण काहीतरी पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं ठरवलं. मात्र, तेव्हा कारागृहात ती सोय नव्हती.

तुरुंगातून रजेवर आल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठात चौकशी करून एम.ए.साठी बहिःस्थ विद्यार्थी व्हायचं ठरवलं.

त्यासाठी कारागृह पोलिस महानिरीक्षकांची परवानगी घ्यावी लागली.

पुढे मध्यवर्ती कारागृहातून पुण्याच्या येरवड्याला खुल्या कारागृहात आले.

 

एका कैद्याची प्रेरणादायी कथा!

आजच्या घडीला अनेक आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्याखाली तुरुंगात जात आहेत.

त्यातील काही हे परिस्थिती नुसार गुन्हेगार बनतात.

तुरुंगात गेल्यानंतर त्यांची मानसिकताही बदलत असते.

मात्र नंतर समाज त्यांना स्वीकारत नाही असं चित्र बहुदा दिसतं.

त्यामुळे सतीश शिंदे यांच्यासारखे अनेक कैदी आज जेव्हा बाहेर येतील तेव्हा समाजाने त्यांच्याकडे आपला माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे.

तब्बल साडेसतरा वर्षे तुरुंगात घालविल्यावर 14 सप्टेंबर 2018 रोजी त्यांची मुक्तता झाली. चांगल्या वर्तुवणुकीबद्दल त्यांची 8 वर्षे 6 महिने 18 दिवस शिक्षा माफ करण्यात आली. आता ते कारागृहातून सुटणाऱ्या बंद्यांसाठी काम करणाऱ्या नवजीवन मंडळात नोकरी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *