पेट्रोल दरवाढीमुळे पृथ्वीराज चव्हाणांचा केंद्र सरकारवर निशाणा

देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्यसरकारही त्यावरील दर कमी करेल, त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. मात्र सध्या पेट्रोलचे कर हेच केंद्राच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत झाले आहे. त्यावरच सध्या पगारापासून ते विकास कामापर्यंत सर्वकाही खर्च भागवला जात आहे. यामुळे सध्याची भारताची हालाखीची परिस्थिती पाहता पेट्रोलचे कर कमी करतील अशी शक्यता वाटत नाही,’
‘देशात १०० कोटी लस दिल्याची जोरदार जाहिरातबाजी सुरू आहे. परंतु देशात फक्त ३० कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २१ टक्के आहे. लस देण्यात भारत जगाच्या १४४व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण लसीकरणात किती मागे आहोत हे लक्षात येईल. तरीही लसीबाबत जी जाहिरातबाजी सुरू आहे ती पूर्णपणे चुकीची आहे.’ असेही ते म्हणाले.
लसीकरण हा इव्हेंट नाही, ती प्रक्रिया आहे. केंद्राची ती जबाबदारी आहे आणि नागरिकांचा तो हक्क आहे, त्यामुळे लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यात जाहिरातबाजी कशासाठी केली जात आहे? असा सवाल चव्हाणांनी उपस्थित केला आहे.