Wed. Aug 10th, 2022

‘…तर तुमचा तीनवेळा घटस्फोट झाला नसता’; इम्रानला रामूचा टोला!

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.

संवादाने प्रश्न सुटतात, असा सूर लावणाऱ्या इम्रान खान यांना वर्मा यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.

संवादाने प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता, असे ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग केलं आहे.

वर्मा यांच्या या ट्विटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

राम गोपाल वर्मा यांनी 5 ट्विट करत इम्रान खान यांना लक्ष्य केलं आहे.

‘समोरुन एकजण तुमच्या दिशेने एक गाडी घेऊन येतो. ती आरडीएक्सने भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा, हे खान यांनी शिकवावे.

खान यांनी याबद्दल मार्गदर्शन केल्यास, आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणादेखील देऊ’, असे म्हणत वर्मा यांनी खान यांना सणसणीत टोला लगावला आहे.

दहशतवादी कारवायांचे पुरावे मागणाऱ्या खान यांना वर्मा यांनी दुसऱ्या ट्विटमधून एक प्रश्नदेखील विचारला.

‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जर तुमच्या देशात ओसामा आहे, हे अमेरिकेला समजतं.

पण तुमच्या स्वत:च्या देशाला कळत नाही. तर तुमचा देश खरंच तुमचा आहे?’, असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला.

पाकिस्तानातील सक्रीय दहशतवादी संघटनांवरुनदेखील वर्मा यांनी खान यांना खोचक शब्दांमध्ये लक्ष्य केलं.

‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा तुमचे प्ले स्टेशन्स नाहीत, असे मला कोणीच सांगितले नाही.

मात्र तुमचे त्या संघटनांवर प्रेम नाही, असे तुम्ही म्हटल्याचे मी कधीही ऐकलेले नाही,’ असा टोला वर्मा यांनी लगावला. राम गोपाल वर्मा यांनी क्रिकेटच्या संज्ञा वापरुनदेखील चौफेर टोलेबाजी केली.

‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, तालिबान आणि अल-कायदा हे तुमच्याच देशातले चेंडू आहेत, असे मी ऐकले. हे चेंडू तुम्ही सीमेपार टोलवून भारताच्या पॅव्हेलियनमध्ये पाठवता.

क्रिकेटचे चेंडू तुम्हाला बॉम्ब वाटतात का सर? कृपया मार्गदर्शन करा,’ असे वर्मा यांनी म्हटले आहे.

राम गोपाल वर्मा यांच्या सर्व ट्विट्सची सध्या सोशल मीडियात जबरदस्त चर्चा आहे. वर्मा यांनी त्यांच्या सर्व ट्विटमध्ये खान यांना टॅग केलं आहे.

त्यामुळे आता या ट्विट्सना इम्रान खान काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुलवामातील हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.