उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला पुणे मेट्रोला हिरवा कंदील

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून वनाज ते आयडियल कॉलनी मार्गावर मेट्रोची पहिली चाचणी पार पडली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश मिश्रा उपस्थित होते.
तीन डब्यांच्या दोन मेट्रो रेल्वेद्वारे साडेतीन किलोमीटर अंतरात ही चाचणी झाली. मेट्रोकडून याच मार्गावर काही दिवसांपूर्वी सरावपूर्व चाचणी घेण्यात आली होती. ‘निवडणुका झाल्यावर राजकीय विचार बाजूला ठेवून विकास कामाला महत्त्व द्यायचं असतं, हे लक्षात घेऊन आम्ही काम करत आहोत. त्यातूनच पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. पुणेकरांचे आभार मानतो’, असं अजित पवार म्हणाले.
पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मान्यता दिली असून दोन रिंग रोड, १० मेट्रो मार्गिका यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पुण्याला सर्वोत्तम शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.