पुणेकरांकडून पंतप्रधान मोदींना मानाचा फेटा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी, ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पुणेकरांच्या वतीने, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून पंतप्रधान मोदींसाठी शाही फेटा तयार करून घेतला आहे.
पुणेकरांच्यावतीने, पंतप्रधान मोदी यांच्यासाठी सोन्याचा मुलामा असलेला फेटा तयार करण्यात आला आहे. या फेट्याला ऑस्ट्रेलियन हिरे जडवण्यात आले आहेत. तसेच या फेट्यावर राजमुद्रा अंकित केली असून ती सूर्यफुलावर तयार केलेली आहे. हा मानाचा फेटा तयार करण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. तर दौऱ्यादरम्यान रविवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी सकाळी दहा वाजता लोहगाव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचे शिवाजीनगर सिंचनभवनाच्या मैदानावर हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. तेथून ते गरवारे महाविद्यालय येथे येतील. आणि त्यानंतर ते आनंदनगर येथील कार्यक्रमाला जाणार आहेत. एमआयटी येथील सभेनंतर ते लवळे येथे जाणार आहेत.