मसूद अझहरसोबत राहुल गांधी; अमेठीत झळकले पोस्टर

भाजपावर निशाना साधताना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या म्होरक्याचा मसूद अझहर’जी’ असा आदरार्थी उल्लेख केल्याने टीकेचे धनी ठरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मसूदसोबतचे फोटो असलेले पोस्टर अमेठीत झळकले आहेत.
अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ असून, भाजपने या पोस्टरमधून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता शुभम तिवारीने हे पोस्टर लावले आहेत.
त्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर हा राहुल गांधी यांचा सत्कार करत आहे, असे दाखवण्यात आले आहे.
‘दहशतवाद्याला ‘जी’ म्हणणारा खासदार अमेठीला नकोय’ असा उल्लेख पोस्टरवर केला आहे.
‘देशाच्या पंतप्रधानांचा अनादर करणारा, दहशतवाद्याचा सन्मान करणारा खासदार अमेठीला मान्य नाही, ‘ असेही पोस्टरमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींनी दहशतवाद्याला सन्मान देऊन भारतीय नागरिकांना मान खाली घालायला लावली आहे.
अमेठीतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण राहुल गांधी हे त्यांचे प्रतिनिधित्व करतात.
अमेठीचा शुभचिंतक या नात्याने पोस्टरच्या माध्यमातून माझी नाराजी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला,’ असे शुभम तिवारीने सांगितले आहे.