राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरे यांनी नुकताच पार पडलेल्या औरंगाबाद येथील सभेत पुन्हा भोंगे उतरवण्याबाबत राज्य सरकारला इशारा दिला. भोंगे हटवण्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मनसेने एक पाऊल मागे घेत रमजान ईदनिमित्त आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला. राज ठाकरे यांनी ट्विट करत महाआरती कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरे यांनी ट्विट केले की, ‘भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी माझ्या ट्वीटद्वारे आपल्यासमोर मांडेन’, असे राज यांनी म्हटले आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली.
शिवतीर्थवर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांची शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक होत आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीस बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्यावरून राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसासंदर्भात राज ठाकरे आज नवी घोषणा करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे राज ठाकरे आणि निवडक मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यामुळे आज शिवतीर्थवरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.