Sat. May 25th, 2019

राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांना हिंदीतून खडे बोल!

1Shares

राज ठाकरे यांची बदलली ‘भाषा’!

उत्तर भारतीयांविरोधात ‘खळ्ळ खट्याक’चा इशारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्यांच्याशी प्रथमच हिंदी भाषेतून संवाद साधला.

राज ठाकरे यांनी का केलं हिंदीतून भाषण?

आपण हिंदीतून का भाषण करतोय याचा खुलासा राज ठाकरे यांनी केलाय. आपण गुजराती समाजाशी मराठीमध्ये संवाद साधला होता. या सभेतही मी मराठीतच बोललो असतो, मात्र हे भाषण उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणीही दाखवणार असल्याने आयोजकांनीच त्या लोकांनाही राज ठाकरे यांची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी आपण भाषण हिंदीतून देत आहोत, असं राज यांनी स्पष्ट केलं.

“हिंदी भाषेला राष्ट्रभाषा मानणं चुकीचं!”

हिंदी भाषा सुंदर भाषा आहे, मात्र तिला राष्ट्रभाषा मानणं चुकीचं आहे. कारण राष्ट्रभाषेचा निर्णय देशात कधी झालाच नव्हता. हिंदीप्रमाणेच मराठी, तामीळ इत्यादी भाषाही राष्ट्रभाषाच आहेत, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.

“मी स्पष्टीकरण द्यायला नव्हे, तर भूमिका हिंदीत मांडायला आलोय”

अब्रहम लिंकन यांच्या विधानाचा दाखला देत आपण येथे स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे, तर आपली भूमिका हिंदीतून मांडायला आलो आहे, असं राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातील स्पष्ट केलं. यानंतर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या लेखाचे संदर्भ देत राज्यघटनेचा अभ्यास नीट न केल्यामुळे लोकांचा असा गैरसमज झालाय, की कोणीही कोणत्याही राज्यात कसंही जाऊ शकतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“भारतातील विविध राज्यं म्हणजे विविध देश!” 

70% पंतप्रधान उत्तर प्रदेशातील, तरीही उत्तर प्रदेशातील युवकांना रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात का जावं लागतं, हे तुम्ही त्या नेत्यांना विचारा.

रेल्वेतील नोकरी भरतीसंदर्भातील जाहिरात एकाही मराठी वर्तमानपत्रात नव्हती. केवळ बिहार, उत्तर प्रदेशातील वर्तमानपत्रात छापून आल्या. त्यामुळे तेथून मुंबईत मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मुंबईत आले. येथे नोकरी असल्यास प्राधान्य मराठी तरुणी, तरुणींना मिळावं, हे सांगण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांना उत्तर भारतीयांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यामुळेच पुढील संघर्ष घडला, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“उत्तर भारतीयांनी आत्मपरीक्षण केल्यास संघर्ष होणार नाही”

यूपी, बिहार, झारखंडमधून दररोज 48 ट्रेन्स भरून येतात, आणि रिकाम्या जातात. येथे वाढत असलेल्या गुन्हेगारीलाही उत्तर भारतीय जबाबदार आहेत. हे गुन्हेगार महाराष्ट्रात गुन्हे करून उत्तर भारतात पळतात. आझाद मैदानात झालेल्या दंगलीमध्ये उत्तर भारतातील मुस्लिमांची संख्या मोठी होती. जर परप्रांतीय आमच्या माता भगिनींशी आक्षेपार्ह वर्तन करत असतील, तर त्याला आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ.

“राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी”

दक्षिण भारतातून एकेकाळी मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतीय मुंबईमध्ये येत. त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांना पुन्हा त्यांच्या राज्यांत पाठवून दिलं. मात्र त्यानंतर तेथील नेत्यांनी आपल्या राज्यांत औद्योगिकीकरण वाढवून तेथील लोकांना नोकरी मिळवून दिली आणि त्यामुळेच आता दक्षिणेतून नोकरीसाठी लोक येणं बंद झालं. हिच माझी भूमिका उत्तर भारतीयांबद्दल असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं.

सर्व राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी. प्रत्येक राज्याने दुसऱ्या राज्यापेक्षा अधिका चांगलं व्हायचा प्रयत्न केला, तर त्यामुळे देशाचंच भलं होणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

“आता तुम्हीच आपल्या लोकांना सांगा, की आता बास!”

प्रत्येक राज्याची सामावून घेण्याची एक मर्यादा असते. महाराष्ट्राची ही मर्यादा संपली आहे. त्यामुळे तुम्हीच आपल्या राज्यातून येणाऱ्या लोकांना स्वतःच सांगा, की आता बास!

नरेंद्र मोदींवरही टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा मुख्यमंत्री आसताना वेगळी होती, आता पंतप्रधान झाल्यावर त्यांची भाषा बदलली असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

अमिताभ बच्चन कॉण्ट्रोव्हर्सीवर राज यांचं उत्तर

अमिताभ बच्चन बॉलिवूडचे शहंशाह मानले जातात. एवढा मोठा कलाकारही जेव्हा निवडणूक लढवताना अलाहबाद मतदारसंघ निवडतो, सुनेच्या नावाने कन्याशाळादेखील उत्तर प्रदेशात काढतो, जर इतका मोठा कलाकार आपलं राज्य विसरत नाही, तर राज ठाकरे त्याच्यापुढे एक छोटा माणूस आहे, तर तो आपल्या महाराष्ट्राची बाजू का नाही घेणार, असं पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रावर अन्याय का?

केंद्राला जर महाराष्ट्राकडून 100 रुपये मिळत असतील, तरी महाराष्ट्राला केवळ 13.20 रुपये मिळतात, मात्र बिहारकडून 100 रुपये मिळत असल्यास बिहारला 139 रुपये केंद्राकडून मिळतात. हा मुद्दा मांडत राज ठाकरे यांनी परप्रांतीय नेत्यांचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *