Mon. Sep 27th, 2021

राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

राज्यात १५ दिवसांची संचारबंदी जाहीर करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. राज्यात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना लसींचा तुटवडा हा गंभीर मुद्दा आहे. महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. पत्रामधून राज ठाकरे यांनी मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरण करावं तसंच खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून त्यातून बाहेर पडण्यासाठी लॉकडाउन आणि निर्बंध लावणं हा उपाय नाही असं मत व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्राला १०० टक्के लसीकरण करण्याची गरज असल्याचं सांगताना त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करु द्यावी अशी मागणी केली आहे.

यासोबत सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना लस उत्पादन करण्याची मुभा दिली जावी तसंच कोरोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

“कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. आज संपूर्ण देश कोरोनाच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *