Fri. Sep 30th, 2022

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधानांचे आभार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. ‘व्हॅक्सिनची संख्या वाढावी यासाठी हाफकीन सारख्या संस्थांना व्हॅक्सिनच्या उत्पादनाची परवानगी द्यावी अशी मागणी आपण केली होती, जी पंतप्रधानांनी मान्य केली’, असे ट्विट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ‘यासाठी मी पंतप्रधानांचा आभारी असून केंद्र सरकार या महामारीवर मात करण्यासाठी कायमच सहाय्य करेल’, अशी आशाही राज यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील लसींच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही हाफकीन संस्थेला लस उत्पादन करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने मागणी परवानगी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरूवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना परवानगीबाबत एक पत्र पाठवले आहे. ‘सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी’, असे या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.