पुण्यात राज ठाकरेंची जाहीर सभा

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर आता पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी १० वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. त्यामुळे पुण्यातील मनसेच्या सभेत राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्व मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांनी अटी, शर्तींसह परवानगी दिली आहे. काय आहेत अटी-शर्थी?
समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत.
सभेत रूढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी.
कार्यक्रमात शस्त्र, तलवारी बाळगू नये, कायदेशीर नियमांचे पालन करावे.
सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.
सभेचे नियम कळवण्याची जबाबदारी आयोजकांवर असेल.
व्यासपीठावरील संख्या निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवावी.
स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा होऊ नये.
कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका तसेच वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी.
सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांसाठी व्यवस्था असावी.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्याचं मनसेकडून सांगितले जात आहे. राज ठाकरे यांना पायाला दुखापत झाली होती. याचा त्रास त्यांना दीड ते दोन वर्षांपासून जाणवत होता. त्यामुळे त्यांने पुण्याचा दौरा देखील अर्धवट सोडून माघारी परतले होते. या दुखण्याचा त्रास जास्त जाणवायला लागला आहे. त्यामुळे ते पुण्यात डॉक्टरांचा सल्ला घेणार आहेत. त्यानंतर अयोध्या दौऱ्याची पुढची तारीख निश्चित करणार असल्याची माहीती सुत्रांकडून देण्यात आली आहे. परंतू या विषयावर सविस्तर बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्यासाठी राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे, आता अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे काय म्हणतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.