‘हिंदूजननायक’ अशी उपाधी कुणाला?

हनुमान जन्मोत्सवानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांचे फलक पुण्यात लावण्यात आले आहेत, तर या फलकांवर राज ठाकरेंचा ‘हिंदूजननायक’ असा उल्लेख करण्यात आला आहे. ठाकरेंना दिलेल्या या नव्या उपाधीची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा होत आहे. तर राज ठाकरे पुण्यात कुमठेकर रस्त्यावर असणाऱ्या मारुती मंदिरात शनिवारी महाआरती करून सामूहिक हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘मशिदींवरील भोंगे उतरवा’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी ठाण्यात जाहीर उत्तरसभा घेतली. मनसेच्या उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. ईदपूर्वी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितले आहेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्याची आमची भूमिका मागे घेणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. अशातच, सभेत तलवार उंचवल्यामुळे ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी मविआवर निशाणा साधला असून मविआमधील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
दरम्यान, युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ‘राज ठाकरे हे मराठी औवेसी आहेत. राज यांच्या कुटूंबाने हनुमान चालीसा तोंड पाठ म्हणून दाखवावी’ अशी टीका केली आहे. अशातच, मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत इशारा दिला होता, त्यामुळे आता पुण्यात याबाबत ठाकरे काही बोलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.