Mon. Dec 6th, 2021

‘नाणार प्रकल्प रद्द झाला, तरी बेसावध राहू नका’, रायगडमध्ये राज ठाकरेंची सभा

सध्या राज्यभर दौरे करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सरकारविरोधात सभा घेत आहेत.  रायगड येथे सभेत पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी दौऱ्यात प्रथमच आपल्या सभेत त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. तसंच नाणार प्रकल्पाबद्दल बेसावध राहू नका, असा सल्लाही त्यांनी सभेत दिला.

गेली 5 वर्षं हा देश नरेंद्र मोदी आणि अमित शाह चालवत आहेत. अगदीच तोंडदेखलं ते अरुण जेटलींना बोलवतात. नोटबंदीसारखा आततायी निर्णय लहरीपणातून घेतला. काँग्रेसच्या योजनांची नावं बदलली आणि त्याच योजना पुढे रेटल्या, हेच मोदींच कर्तृत्व. असं म्हणत काही सातत्याने मांडत असलेले मुद्दे तर काही नवे मुद्दे राज ठाकरेंनी मांडले.

रायगडच्या सभेत काय म्हणाले राज ठाकरे?

तुम्ही मागे काय घडलं, काय बोललं गेलं हे विसरून जाता म्हणून हे पुढारी तुम्हाला गृहीत धरतात. नाणार प्रकल्प तुर्तास बंद केला असला, तरी बेसावध राहू नका. हे लोक निवडणुकांपुरतं प्रकल्प रद्द केल्यासारखं दाखवतील आणि पुन्हा डोकं वर काढतील. शिवसेना-भाजपने एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि पुन्हा युती केली कारण दोन्ही पक्ष लाचार आहेत. पैसे आणि सत्ता ह्यासाठी ते वाट्टेल त्या तडजोडी करतील.

कोकण केरळपेक्षा सुंदर, तरी मागे का राहिलं?

कोकण आणि केरळ ह्यांच्यात भौगोलिक साम्य आहे. कोकण तर केरळपेक्षा खूप जास्त सुंदर आहे. केरळ पर्यटनात कुठे गेलं आणि कोकण मागेच राहिला. कारण इथल्या लोकप्रतिनिधींना काही घेणं देणं नाही. कोकणाची पर्यटनाची क्षमता इतकी अफाट आहे की इथले तीन जिल्हे आख्ख्या महाराष्ट्राची काळजी घेऊ शकतं, अशी खंत व्यक्त केली.

अमोल यादव आणि ‘मेक इन इंडिया’!

वैमानिक अमोल यादवला ‘मेक इन इंडिया’त त्याने इथे व्यवसाय सुरु करावा म्हणून महाराष्ट्र सरकारने वारेमाप आश्वासन दिली. पण व्यवसाय सुरू करताना त्याला सरकारी यंत्रणेने इतकं जेरीस आणलं, की हा मुलगा आता अमेरिकेत एका कंपनीबरोबर हा व्यवसाय सुरु करतोय.

“कोणता चौक निवडायचा?…”

नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांना 5 वर्षात नक्की काय साधायचं होतं?

नोटबंदीतून जर काळा पैसा बाहेर काढायचा होता तर मग भाजपकडे निवडणुका लढवायला जो वारेमाप काळा पैसा आलाय तो आला कुठून?

नोटबंदी आधी जितकं चलन बाहेत फिरत होतं, त्याच्याहून जास्त चलन आत्ता बाहेर आलंय असं RBI च्या ताज्या अहवालात म्हटलंय.

मोदी नोटबंदीच्या दरम्यान म्हणाले होते, “जर नोटबंदी फसलं तर मला भर चौकात शिक्षा द्या.”

आता मोदींनी सांगायचा कुठला चौक निवडायचा, असा सवाल केला.

“60 वर्षांत प्रगती झाली नसती, तर…”

बिहार मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं बांधली. खोटं बोलायला काही मर्यादा?

पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींनी काहीच केलं नाही म्हणून उठसुठ टीका करत रहायची. 60 वर्षांत प्रगतीच झाली नसल्याचे दावे मोदी करतात.

जर 60 वर्षांत प्रगतीच झाली नसती, तर ज्या तांत्रिक प्रगतीच्या आधारावर मोदींनी खोटा प्रचार केला, तो प्रचार करू शकले असते का?

हरिसालनंतर मोदींच्या दत्तक गावाचं वास्तव!

आपल्या आधीच्या सभांमधून त्यांनी हरिसाल गावाचं वास्तव दाखवलं.

यावेळी रायगडच्या सभेत मोदींनी दत्तक घेतलेल्या धसई गावाचं वास्तव राज ठाकरे यांनी Audio visual च्या माध्यमातून दाखवलं.

मोदींनी खासदार म्हणून जे गाव दत्तक घेतलं त्यात काहीच घडलं नाही.

गावात एकही सुविधा आली नाही.

साधे नाले साफ नाही होऊ शकले ना महाविद्यालय ना दवाखाना आहे.

देशातले धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे असं मोदींनी जाहीर केलं.

पण या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि या गावात अनेकांचं बँक खातं नाही.

त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात.

स्वतः दत्तक घेतलेलं गाव जे नीट करू नाही शकले, ते या देशाचं काय भलं करणार, असा सवाल त्यांनी केला.

“अटलजींनी कधी कारगीलचा बाजार मांडला नाही”

नरेंद्र मोदींकडे दाखवण्यासारखं काहीच उरलं नाही. आता पुलवामात शहीद जवानांच्या नावावर ते मतं मागत आहे.

असं काय कारण आहे की इम्रान खान ह्यांना मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत असं वाटतं?

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही कारगील घडलं होतं. मात्र त्यांनी कधी मोदींसारखा त्याचा बाजार मांडला नाही.

असे अनेक मुद्दे मांडत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना राजकीय क्षितीजावरून हटवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *