Wed. Jun 29th, 2022

राज ठाकरे त्यांच्या वक्तव्यावर ठाम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हनुमान जयंतीनिमित्त पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीदिनी पुण्याच्या खालकर चौकातील मारुती मंदिरामध्ये त्यांनी महाआरती केली. मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत राज्यभरातून त्यांच्यावर टीका केली गेली. या टीकेला आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. ‘३ मे’ च्या अल्टिमेटमवर मनसे ठाम आहे, मी भूमिका मागे घेतलेली नाही असं वक्तव्य या वेळी राज ठाकरे यांनी केले आहे.

तर, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ‘भोंग्याचा विषय धार्मिक नाही, तर सामाजिक आहे’ , त्यामुळे राज्यात हाणामारी नको, शांतता भंग करण्याची गरज नाही असंही राज ठाकरे म्हणालेत. मशिदीसमोर भोंगे असल्यास त्यांच्यावर कारवाई नाही मात्र, आम्ही हनुमान चालिसाचे भोंगे लावल्यावर कारवाई होणार असं शासन का ? असा प्रश्न ठाकरेंनी विचारलाय. मशिदीचे भोंगे ४ वेळा लावले जातात तर आम्ही दिवसातून ५ वेळा हनुमान चालिसा लावणार असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. याबरोबरच , ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत घोषित केलं आहे. तर, १ मे , महाराष्ट्रदिनी ते औरंगाबादमधील संभाजीनगर येथे सभा घेणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या मशिदीच्या भोंग्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातुन चर्चेला उधाण आलं आहे. आता महाराष्ट्रदिनी संभाजीनगरमध्ये राज काय म्हणतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.