Wed. May 12th, 2021

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं निधन

पुणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज पहाटे करोनामुळं निधन झालं. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम आणि मनमिळावू अधिकारी असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय आणि माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चार दिवसांपूर्वी सरग यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. २६ मार्च रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रक्तातील साखर वाढल्यानं त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळं त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके आणि दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते मोफत व्यंगचित्र करून देत असत.
राजेंद्र सरग यांची पत्नी आणि एका मुलालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *