Thu. May 6th, 2021

‘१८ ते ४४ वयोगटासाठी सधन वर्गाने लस विकतच घ्यावी’

राज्यात एकीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता असताना दुसरीकडे केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा जरी मिळाला आहे. मात्र, १८ ते ४४ या वयोगटातील सधन वर्गाने लसीचे डोस विकतच घेतले पाहिजेत, असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी गुरुवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे आवाहन केलं आहे. ‘लस कोणत्या घटकांना मोफत द्यायची यावर निर्णय घेतला जाईल. गरिबांसाठी मोफत लस देण्याबाबत देखील योग्य तो निर्णय घेण्यात येईल’, असं देखील राजेश टोपेंनी यावेळी नमूद केलं. २४ एप्रिलपासून कोविन अॅपवर १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी सुरू होणार आहे.

सर्वांना लस देण्यासाठी पुरेसे डोस मिळावेत, यासाठी आता परदेशी लसींना देखील देशात मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या लसी अत्यंत महागड्या असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे. ‘परदेशी लसी अत्यंत महागड्या आहेत. आपल्यापेक्षा त्यांच्या लसींच्या ७ पट, ८ पट किंवा १० पट जास्त किंमती आहेत. पण त्यांच्याशी चर्चा करून जर त्यांनी लस कमी किंमतीत देण्याचं मान्य केलं, तर त्यांच्याकडून देखील लस खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल’, असं राजेश टोपे म्हणाले.

संपादन- सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *