Jaimaharashtra news

राजू शेट्टींच्या आंदोलनापुढे राज्य सरकार नमले; मुख्यमंत्र्यांचे शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण

पुरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. तसेच, ही नृसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यानुसार आज ही पदयात्रा नृसिंहवाडीत दाखल झाली . यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या देखील मारल्या, त्यांना पोलीस प्रशासनाने बोटींच्या सहायाने तातडीने बाहेर काढले. या आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. कारण, पूरग्रस्तांचे प्रश्न आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राजू शेट्टी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले आहे. असे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज नृसिंहवाडी येथे राजू शेट्टी यांना प्रशासनाकडून सर्वांच्या समक्ष देण्यात आले.

इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र सादर केले.तर, नृसिंहवाडी येथे सभा सुरू होण्यापूर्वी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांचे पत्र सादर केले. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्यासमवेत उद्या दुपारी तीन वाजता वर्षा शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले असल्याचे नमूद केलेले आहे.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काढलेल्या पदयात्रेत मोठ्या प्रमाणात शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांना २०१९ च्या निकषांप्रमाणे मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन उभं केलं आहे. आज ४ वाजेपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जलसमाधीचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा संगमावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

‘कार्यकर्त्यांनी असं काही करू नये, संयम बाळगावा. ज्यावेळी जीव धोक्यात घालायचा असेल त्यावेळी पहिला नंबर माझा असेल. माझ्या अगोदर कुणीही गडबड करू नये. पोलीस प्रशासनाने आम्हाल नृसिंहवाडी एसटी स्टॅण्डवर एकत्र येण्यास परवानगी दिलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर शासनाचा काही प्रस्ताव येणार आहे, तो प्रस्ताव काय आहे ते पाहून आम्ही पुढचा विचार करू. उपजिल्हाधिकारी मला भेटायला येणार आहेत. ते काय प्रस्ताव आणणार आहेत ते पाहून आम्ही ठरवणार आहोत’,असं राजू शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. रात्रीपासूनच जिल्हा प्रशासन राजू शेट्टींशी संवाद साधत आहे. संवादाची दारे नेहमीच उघडी आहेत. मला हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही. पंचगंगा परिक्रमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे प्रशासन हादरलं असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं.

 

Exit mobile version