Thu. Sep 29th, 2022

राकेश झुनझुनवाला यांचे निधन

मुंबई शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले आहे. राकेश झुनझुनवाला हे ६२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने शेअर बाजार विश्वातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या अकासा एअर या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांना किडनीचा आजार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

राकेश झुनझुनवाला यांनी ऐंशीच्या दशकात वडिलांच्या मार्गदर्शनात शेअर बाजारातील गुंतवणुकीस सुरुवात केली होती. त्यावेळी अवघ्या पाच हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली होती. या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीच्या आधारे त्यांनी आपले अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले होते. त्यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदार वर्गामध्ये राकेश झुनझुनवाला हे लोकप्रिय होते. राकेश झुनझुनवाला हे कोणत्या कंपनीचे शेअर घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. जुलै २०२२ अखेरीस त्यांची संपत्ती ५.५ अब्ज डॉलर इतकी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राकेश झुनझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत ३२ व्या स्थानी होते.

महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.