लॉकडाऊनदरम्यान लोकाग्रहास्तव पुन्हा ‘रामायण’, ‘महाभारत’ सुरू

कोरोनाचा फैलाव देशात होऊ नये, यासाठी सरकारने २१ दिवसांचं लॉकडाऊन घोषित केलं आहे. अनेक सिनेमा, सिरियल्सची शुटिंग्जदेखील बंद करण्यात आली आहेत. अशा वेळी मोठ्या संख्येत घरात अडकून असणाऱ्या लोकांच्या मनोरंजनाचा प्रश्नदेखील विचार करण्यासारखा आहे. अशा दूरदर्शनवर पुन्हा रामायण, महाभारत या मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार २८ मार्चपासून दूरदर्शनवर पुन्हा एकदा ‘रामायण’ ही मालिका सुरू होत आहे.
एकेकाळी दुरदर्शनवर रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेचा आणि बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेचा चांगलाच बोलबाला होता. टीव्हीवर या मालिका सुरू झाल्यावर रस्त्यावर सामसूम होत असे. लोक या मालिका भक्तीभावाने पाहात. या मालिकांनी अक्षरशः भारतीय टीव्हीक्षेत्रात इतिहास घडवला होता. आता लॉकडाऊन दरम्यान पुन्हा या मालिका सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती.
केंद्रीय महिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी Tweet करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
रामायण मालिका पुन्हा सुरू करण्यात येत आहे. रामानंद सागर यांनी निर्मिती केलेल्या रामायण मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्यानंतर अनेकवेळा ‘रामायण’ मालिका विविध प्रकारे तयार करण्यात आली. मात्र दूरदर्शनच्या ‘रामायण’ मालिकेइतकी इतर कोणत्याच रामायणला लोकप्रियता मिळाली नाही. ‘रामायण’ मालिकेतील प्रत्येक पात्रावर आणि कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मालिकेसंदर्भात Tweet केलं आहे.