‘Gully Boy’मधील ‘मेरे गली में’ गाणं रिलीज

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गली बॉय’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झोपडपट्टीत लहानचा मोठा झालेला आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या 26 वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा प्रेक्षकांना ‘गली बॉय’मध्ये पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार असून काही दिवसापूर्वी या सिनेमातील ‘अपना टाईम आयेगा’ हे पहिलं गाण रिलीज झालं होतं. हे गाणं खुद्द रणवीरने गायले असून ते रॅप साँग होते.

हे रॅप साँग ऐकल्यानंतर या सिनेमाविषयी असलेली प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली. त्यातच आता या सिनेमातील ‘मेरे गली में’ हे दुसरे गाणंही रिलीज झालं आहे.

‘मेरे गली में’ असे बोल असलेल्या या गाण्यात रणवीर हटके अंदाजात दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे गाणंदेखील रॅप साँग प्रकारात मोडणारं आहे.

त्यामुळे हे गाणं सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. या गाण्यामधून झोपडपट्टीतील वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

घरं जरी लहान असली,तरी येथे राहणाऱ्या माणसांची मनं आणि त्यांची स्वप्न मोठी असतात, हे या गाण्यातून सांगण्यात आले आहे. या गाण्यात रणवीरसोबत डिव्हाइनदेखील दिसून येत आहे.

मुंबईच्या चाळ संस्कृतीतून रॅपर्सच्या दुनियेत नावलौकिक मिळवणाऱ्या ‘डिव्हाइन’ म्हणजे विवियन फर्नांडिस आणि ‘रॅपर नॅझी’ म्हणजेच नावेद शेख यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटनांपासून ‘गली बॉय’च्या कथानकासाठी प्रेरणा घेण्यात आली आहे.

‘गली बॉय’ हा सिनेमा येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

Exit mobile version