रेणू शर्मा यांच्या वकिलाचा दावा ‘व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यावर तोंड बंद होतील’,

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. शिवाय यादरम्यान आता आरोप करणाऱ्या महिलेचे वकिल रमेश त्रिपाठी यांनी माध्यमांशी बोलताना काही धक्कादायक खुलासा केला आहे.

“गेल्या चार दिवसांपासून आम्ही तक्रार केली. मात्र ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही निराश आहोत. संबंधित मंत्र्याला ब्लॅकमेल केल्याचा माझ्या अशीलावर जो आरोप केला जातोय, तो खोटा आहे. माझी अशील महिन्याला १० ते १२ हजार रुपये भाडं भरुन पेईंग गेस्ट म्हणून राहते. तिची स्वत:ची कुठलीही प्रॉपटी नाही. गाडी किंवा घरही नाही. एखाद्याला ब्लॅकमेल करणारी महिला अशी राहणार नाही”असं रमेश त्रिपाठी यांनी सांगितलं.

“माझ्या अशीलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मागच्या तीन महिन्यांपासून दागिने विकून ती स्वत:च उदरनिर्वाह करते. तिच्यावरील ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा आहे. आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी ते पुरावे उघड करु शकत नाही. तपासातून अनेक गोष्टी समोर येतील. व्हिडिओ क्लिप्स बाहेर आल्यानंतर तोंड बंद होतील. सध्या तपास सुरु असल्यामुळे मी या गोष्टी उघड करु शकत नाही” असं रमेश त्रिपाठी यांनी म्हटलं.

Exit mobile version