मिसेस मुख्यमंत्री आजपासून दै. सामनाच्या संपादक

मिसेस मुख्यमंत्री म्हणजेच रश्मी ठाकरे आजपासून दैनिक सामनाच्या संपादक असणार आहेत. रश्मी ठाकरे यांच्या रुपात सामनाला पहिल्या महिला संपादक भेटल्या आहेत.
सामनाच्या क्रेडिट लाईनमध्ये संपादक हुद्दयापुढे रश्मी ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
कोणत्याही शासकीय पदावर असताना वृत्तपत्राच्या संपादकपदी राहता येत नाही. तसेच संपादक हे पद लाभाचे आहे.
त्यामुळे शासकीय पदावर असताना कोणतंही लाभाच्या पदावर राहता येत नाही.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच सामनाचं संपादकीय पदाचा त्याग केला होता.
तेव्हापासून ते आतापर्यंत सामनाचं संपादक पद हे रिक्त होतं. तसेच सर्व अधिकार हे संजय राऊत यांच्याकडे देण्यात आले होते.
उद्धव ठाकरेंच्या आधी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती. बाळासाहेब ठाकरे हे दैनिक सामनाचे संस्थापक संपादक आहेत.
इतर मुखपत्रांच्या तुलनेत दैनिक सामना नेहमीच चर्चेत असतो. सामनामधील अग्रलेखाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. तसेच राष्ट्रीय माध्यमांना देखील सामना अग्रलेखाची दखल घ्यावी लागते.
सामना अग्रलेखातून गेल्या काही दिवसांपासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजवपर टीका केली जात आहे. सामनाची स्वतंत्र अशी आक्रमक भाषाशैली आहे.
सामनामधून आतापर्यंत संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली आहे. त्यामुळे आता रश्मी ठाकरे सामनाचा कार्यभार कसा पाहतात, याकडे साऱ्या राज्याचं लक्ष असणार आहे.