रतन टाटा यांना UK च्या नामांकीत मँचेस्टर विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी

टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांना नवनिर्मिती आणि समाजसेवा या क्षेत्रांतील अभूतपूर्व योगदानाबद्दल युकेच्या प्रख्यात मँचेस्टर विद्यापीठाने मानाची डॉक्टरेट ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे. University of Manchester च्या अध्यक्ष आणि उप-कुलगुरू प्रोफेसर डेम नॅन्सी रॉथवेल यांनी मुंबई दौऱ्यात रतन टाटा यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला आहे.

यावेळी 82 वर्षीय रतन टाटा यांच्या कामाचा गौरव करताना रतन टाटा यांचं कार्य स्फूर्तीदायी आहे, असं रॉथवेल म्हणाल्या.

समाजसेवा आणि नवनिर्माण या दोन्ही गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी एकाच चाकाचे दोन आरे आहेत. मोठा बिझनेस, लघुद्योग, संशोधक या सर्वांसाठी टाटा यांनी केलेलं सहाय्य लक्षणीय आहे. टाटा ट्रस्ट संस्थेद्वारे त्यांनी केलेली समाजसेवा यांनी खूप मोठा परिणाम साधल आहे. टाटा यांचं उदाहरण हे आमच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल सिटिझन बनण्यासाठी आधारभूत ठरेल, असंही त्या म्हणाल्या.

1991 ते 2012 या काळात रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा ग्रुपने जागतिक स्तरावर मोहर उमटवली. टेटली, डेअवू, कोरस, जॅग्वार आणि लॅण्ड रोव्हर सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वविख्यात ब्रँड्स आपल्या पंखाखाली घेत टाटा यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय, याचा उल्लेख या प्रसंगी करण्यात आला. तसंच स्वच्छता, पोषण, ग्रामीण भारतातील गरीबी, समाजात उद्योगधंद्यांना चालना देणं, कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर उपरचार यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांसाठी त्यांनी केलेलं कार्य विचारात घेऊन त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं.

Exit mobile version