जाणून घ्या ‘खालसा’ पंथाचे संस्थापक शीख गुरू गोबिंद सिंग यांच्याबद्दल

शीखांचे दहाव्या गुरुचा म्हणजेच गुरु गोबिंद सिंग (Guru Gobind Singh Birth Anniversary) यांचा आज जन्मदिवस… शीख धर्माच्या 10 गुरूंपैकी गोबिंद सिंग हे शेवटचे मानव गुरू. कुशल योद्धा आणि आध्यात्मिक संत असा अलौकिक संगम त्यांच्या ठायी होता. आपल्या कारकीर्दीत त्यांनी शीख धर्माची (Sikhism) ध्वजा नव्या उंचीवर नेली. त्यामुळेच शीखांमध्ये गुरू गोविंद सिंग (Guru Gobind Singh) यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गुरू गोबिंद सिंग यांचं कार्य

गुरू गोबिंद सिंग यांचं बालपणीचं नाव गोविंद राय होतं.

गुरु गोविंदसिंग यांचा जन्म 2 डिसेंबर 1666 पाटण्यात झाला होता.

त्यांनी पहिली चार वर्षे बिहारमधील पाटणा येथे घालवली.

गुरू गोविंद सिंग यांचं कुटुंब 1660 ला पंजाबला गेले.

त्यानंतर दोन वर्षांनी 1662 साली त्यांचं कुटुंब हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये असलेल्या ‘चक्क नानकी’ या ठिकाणी गेलं. आज ‘नानकी’ला ‘आनंदपूर साहिब’ (Anandpura Sahib) म्हणतात. येथूनच त्यांचे शिक्षण सुरू झालं.

त्यांनी संस्कृत आणि पर्शियन भाषेचं शिक्षण घेतलं.

त्यानंतर त्यांनी सैनिकी प्रशिक्षण घेतलं.

राजा भीम चंद यांच्याशी मतभेद झाल्यानं गुरुंना आनंदपूर साहिब सोडवं लागलं आणि ते टोका शहरात गेले. त्यानंतर त्यांना मतप्रकाश यांनी त्यांच्या राज्यात आमंत्रित केलं आणि पाओन्टा येथे किल्ला बांधून दिला. पाओन्टा येथे गुरू गोबिंद सिंग यांचं सुमारे तीन वर्षे वास्तव्य होतं. या वास्तव्यात त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली.

11 नोव्हेंबर 1675 रोजी औरंगजेबाने गुरू गोबिंद सिंग यांच्या वडिलांचा म्हणजेच शिखांचे नववे गुरू ‘गुरु तेग बहादूर’ यांचा दिल्लीच्या चांदनी चौकात शिरच्छेद केला.

यानंतर गोविंदसिंग यांना 29 मार्चला 1676 रोजी बैसाखीच्या दिवशी शीखांचा दहावा गुरु म्हणून घोषित करण्यात आलं.

गुरू गोबिंद सिंग संतकवी होते. ते अनेक भाषांचे जाणकार आणि अनेक ग्रंथांचे रचनाकार होते.

‘गुरू ग्रंथ साहिब’ या शिखांच्या पवित्र ग्रंथाचं लेखन त्यांनी पूर्ण केलं.

त्यांच्या दरबारात 52 कवी आणि लेखक उपस्थित असत, म्हणूनच त्यांना ‘संत सिपाही’ असंही म्हणतात.

या शिवाय त्यांना ‘दशमेश’, ‘बजनवाले’, ‘कलगीधर’ अशा अनेक उपाध्यांनी जनतेने गौरवलं.

 आपल्या आधीच्या गुरूंचं कार्य यशस्वीपणे पुढे नेत असतानाच त्यांनी शीख धर्माला शौर्याचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं. त्यामुळे शीख धर्मात त्यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे.

खालसा पंथाची स्थापना

शीख धर्मावर होणाऱ्या आक्रमणाविरोधात शीख फौज निर्माण करण्याच्या उद्देशाने खालसा पंथाची त्यांनी स्थापना केली.

1699 साली ‘बैसाखी’ सणाच्या दिवशी गुरू गोबिंद सिंग यांनी ‘खालसा’ पंथ सुरू केला.

बलिदानाची तयारी असणाऱ्या पहिल्या 5 अनुयायांपासून त्यांनी ‘खालसा’ पंथाची सुरूवात केली.

तेव्हापासून शीख पुरूष आपल्या नावामागे ‘सिंग’ म्हणजेच ‘सिंह’ हे उपनाम लावू लागले.

केश, कंगा, कडा, कृपाण, कच्चेरा या 5 ‘क’कारांचं महत्त्व पटवून शिखांना नियम समजावून सांगितले.

आपल्या झंझावाती कारकीर्दीत त्यांनी मोंगल तसंच शिवालिक टेकड्यांवरच्या आक्रमकांसोबत 14 युद्धं लढली.

1687ला नादौनच्या लढाईत, गुरु गोविंद सिंग, भीम चंद आणि इतर सहकारी पहाडी राजांच्या सैन्याने अलीफ खान आणि त्याच्या सैन्याचा पराभव केला.

1695मध्ये लाहोरच्या दिलावर खानाने आपला मुलगा हुसेन खान याला आनंदपूर साहिबवर हल्ला करायला पाठवलं.

या युद्धात त्यावेळी मोगल सैन्याचा पराभव झाला.

हुसेनच्या म़त्यूनंतर दिलावर खानाने जुझार हाडा आणि चंदेल राय यांना शिवालिकला पाठवलं. मात्र त्यांचादेखील गुरूंनी पराभव केला.

पहाडी प्रदेशात सातत्याने असा पराभव होत असल्यानं मुघल बादशाह औरंगजेब चिडला.

गुरू गोबिंद सिंग यांचा परिवार

गुरु गोविंद यांच्या तीन पत्नी होत्या त्यांचा पहिला विवाह दहा वर्षाचे असताना माता जीतोशी यांच्याशी झाला. त्यांना जुझारसिंग, जोरावरसिंग, फतेहसिंग अशी 3 मुले होती.

त्यांचा दुसरा विवाह वयाच्या 17व्या वर्षी माता सुंदरी यांच्याशी झाला.

त्यांना या विवाहपासून अजितसिंग नावाचा एक मुलगा झाला.

15 एप्रिल 1700 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी माता साहिब देवानशी लग्न केलं.

या लग्नापासून त्यांना कोणतंही मुल झालं नव्हतं.

धर्मोद्धारासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा त्याग केला. त्यामुळे त्यांना ‘सर्बानसंदानी’ देखील म्हटलं जातं.

गुरूपुत्रांचं बलिदान

मुघलांना धूळ चारत गुरू गोबिंद सिंग जेव्हा चमकौर येथे पोहोचत होते, तेव्हा सरसा नदी पार करताना माता गुजरी आणि आपले दोन्ही लहानगे पुत्र साहबज़ादे झोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्याशी ताटातूट झाली.

गुरू गोबिंदसिंग यांची कोवळी बालकंही वडिलाप्रमाणेच शूरवीर होती.

गद्दारीचा फटका बसल्याने छोटे साहबजादे जोरावर सिंग आणि फतेहसिंग मुघलांच्या हाती लागले.

या दोन्ही बालकांना सरहिंदच्या नवाबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला. मात्र दोन्ही चिमुकल्यांनी मोठ्या निर्भीडपणे आपला धर्म सोडण्यास नकार दिला.

यामुळे संतप्त झालेल्या नवाबाने 9 वर्षांच्या झोरावर सिंग आणि 6 वर्षांच्या फतेह सिंग यांना भिंतीत जिवंत चिणून ठार करण्याची शिक्षा दिली. मात्र तरीही दोन्ही मुलांनी आपला शीख धर्म सोडला नाही.

27 डिसेंबर 1704 रोजी दोन्ही साहबज़ाद्यांना भिंतीत गाडून टाकलं गेलं.

धर्मासाठी बलिदान देत गुरूपुत्रांनी शौर्याचं प्रमाण दिलं.

गुरू गोबिंदसिंग यांना जेव्हा आपल्या मुलांच्या बलिदानाबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी औरंगजेबाला ‘जफरनामा’ म्हणजेच ‘विजयाचं पत्र’ लिहिलं.

या पत्रात त्यांनी औरंगजेबाला खालसा पंथ मुघल साम्राज्यला नष्ट करण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. हे पत्र गुरू गोबिंद सिंग यांच्या मुत्सद्देगिरीची साक्ष देतं.

या पत्रात शौर्यपूर्ण लिखाण, आध्यात्मिक ज्ञान, कूटनीती यांची काव्यात्मक सांगड अत्यंत प्रभावीपणे घातली होती.

या पत्रातून उत्तर भारतातील परिस्थिती, शीखांची ताकद याचं मर्मभेदी वर्णन केलं होतं. हे पत्र आपला बंधू दया सिंग याच्याकरवी औरंगजेबाला पाठवण्यात आलं.

ज्यावेळी अहमदनगर येथे आजारपणाने ग्रासलेल्या औरंगजेबाने हे पत्र वाचलं, त्यावेळी त्याला आपल्या चुकूची जाणीव झाली. त्याने गुरू गोविंद सिंग यांची माफी मागण्याच्या उद्देशाने सन्मानपूर्वक आमंत्रित केलं. मात्र गुरू गोबिंद सिंग यांच्याशी भेट होण्यापूर्वीच नैराश्यग्रस्त औरंगजेबाचा मृत्यू झाला.

दरम्यान 8 मे 1705 रोजी ‘मुक्तसर’ येथे झालेल्या भयंकर युद्धातही गुरू गोबिंद सिंग यांनी विजय मिळवला. औरंगजेबाच्या भेटीसाठी दक्षिणेकडे निघाले असतानाच गुरू गोबिंद सिंग यांना 1706 साली औरंगजेबाच्या मृत्यूची माहिती मिळाली.

औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बहादुरशाह याने गुरू गोबिंद सिंग आणि शीख धर्मीयांशी चांगले सौहार्द्राचे संबंध ठेवले.

याच संबंधांमुळे घाबरलेल्या नवाब वाजीत खान याने गुरू गोबिंद सिंग यांच्यावर हल्ला करवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुरूंनी वयाच्या 42 व्या वर्षी 7 ऑक्टोबर 1708 रोजी महाराष्ट्रातील नांदेड येथे अखेरचा श्वास घेतला.

आपल्या पश्चात आपला गुरूपदाचा वारसदार म्हणून कोण्या व्यक्तीची निवड न करता त्यांनी गुरूंनी लिहिलेल्या आणि गुरू गोबिंद सिंग यांनी पूर्ण केलेल्या ग्रंथ साहिबालाच पुढे कायमस्वरूपी गुरू मानण्याचा आदेश शीख धर्मीयांना दिला. तेव्हापासून शीख समूदाय गुरूद्वारेमध्ये निरंतर ‘गुरू ग्रंथ साहिबा’पुढे नतमस्तक होतो.

Exit mobile version