Sun. Jun 20th, 2021

विसापूर किल्ल्यावरचा थरार, ‘त्या’ पर्यटकाची अखेर सुटका!

विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या एका हौशी पर्यटकाची पाच तासाने सुटका झाली. अमर कोरे असं या तरुण पर्यटकाचं नाव आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून या पर्यचकाची सुटका झाली.

काय घडलं नेमकं?

मार्ग माहीत नसताना 8 ते 10 हौशी तरुणांनी भाजे लेणीकडून विसापूर किल्ल्याची चढाई सुरू केली.

गप्पांत गुंतून किल्ला दिसतोय म्हणून तरुणांनी आगेकूच केली.

पहिला टप्पा सरही केला, पण बोलण्याच्या नादात ते भरकटले आणि थेट जंगलात घुसले.

कसंबसं पुढं बाहेर पडले.

वर पाहिल्यावर त्यांना किल्ल्याचा बुरूज दिसला.

मागचा-पुढचा विचार न करता ते बुरुजाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

पण ही तीव्र चढाई अमरला काही झेपली नाही.

तो अशा ठिकाणी अडकला तिथून न वर चढू शकत होता, न खाली उतरू शकत होता.

पाय घसरला तर तो थेट खोल दरीत पडण्याची भीती होती.

अशातही मित्रांनी अर्धा तास त्याला वर घेण्याचे प्रयत्न केले.

नंतर ग्रुपमधील कौशिक पाटीलने शिवदुर्ग रेस्क्यू टीमचा नंबर मिळवला आणि ही बाब कानावर घातली.

Whatsapp वर घटनास्थळ स्पष्ट होईल असे व्हिडीओ ‘शिवदुर्ग’ने मागवले.

मग ‘शिवदुर्ग’च्या Whatsapp Group वर मेसेज टाकून बचावकार्याला टीम सज्ज करण्यात आली.

घटनास्थळाच्या परिसरात टीम सदस्य सागर कुंभार तातडीनं मार्गस्थ झाला आणि अडकलेल्या अमरला पकडून ठेवलं.

कौशिकच्या फोन नंतर साधारण दीड तासात टीम घटनास्थळी पोहचली.

बचावकार्य सुरू झालं, पण दमदार पावसाने हजेरी लावली.

अशातही टीम ने तमा बाळगली नाही.

विकास मावकरने खाली उतरायची तयारी दर्शवली, दोरी आणि हार्नेसच्या साह्याने विकास कसाबसा अमर उभा असलेल्या जागेशी पोहचला.

अमरलाही हार्नेस देण्यात आलं.

मग सागर आणि विकास त्याला दोरीच्या साह्याने वर घेऊन आले.

अशा रीतीने या हौशी पर्यटकाची तब्बल पाच तासाने सुखरूप सुटका झाली.

अमरने शिवदुर्ग टीमचे आभार मानले.

या प्रसंगातून हौशी पर्यटकांनी धडा घ्यावा आणि पर्यटनस्थळांची अपुरी माहिती घेऊन पर्यटन करण्याचं धाडस करू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *