Fri. Sep 30th, 2022

मुंबईत खासगी संस्थेकडून बनावट लसीकरण?निवासी संकुलाचा खळबळजनक दावा

मुंबई: आपल्याला बोगस लस दिली गेली असल्याचा आरोप करत बोगस पद्धतीने लसीकरण करण्यात आल्याची खळबळजनक माहिती मुंबईतील एका निवासी संकुलातील नागरिकांनी केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

लस घेतल्यानंतर कोणालाही मेसेज आला नाही, तसेच ज्या रुग्णालयांच्या नावाने लसीकरणानंतर प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी ‘आपण लसीकरण शिबीर आयोजित केलंच नाही’, असं म्हटलं आहे. त्यामुळे या घटनेनं लस घेतलेलया नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मुंबईतील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. संकुलाच्या आवारातच ह्या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. राजेश पांडे याने संकुलातील सदस्यांशी संपर्क केला होता, संजय गुप्ता याने शिबीर घेतलं, तर महेंद्र सिंग याने संकुलातील सदस्यांकडून रोख पैसे घेतले आहेत.

प्रमाणपत्राबाबत रुग्णालयांकडून खुलासा

लसीकरण शिबीर कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचं नाव सांगून घेण्यात आलं होतं. मात्र, सोसायटीतील लसीकरण झालेल्या रहिवाशांना देण्यात आलेली प्रमाणपत्र वेगवेगळ्या रुग्णालयांची होती. त्यावेळी सोसायटीमध्ये लस पुरवत नसल्याचं रुग्णालयांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. संबंधित रुग्णालयातील अधिकारी आणि सोसायटीतील नागरिक यांची चौकशी केली जाईल. जर यात काही गैरकारभार झाला असेल, तर कारवाई करण्यात येईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

‘…तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?’ – भाजप

दरम्यान, भाजप नेते राम कदम यांनी ‘लोकांना बनावट लस टोचली गेली तेव्हा राज्य सरकार झोपले होते का?’, असा सवाल उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.