देशात कोरोना रुग्णवाढ

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र टाळेबंदीची घोषणा करण्यात आली होती तर कोरोना निर्बंध पाळण्याची अट ही घालण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट दिसून आल्यामुळे निर्बंध हटवले गेले होते. मात्र, आता देशात पुन्हा कोरोना विषाणू डोकं वर काढतो आहे. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ३०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने दिल्ली सरकारची चिंता वाढली आहे.
काल दिवसभरात दिल्लीत ३०० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे संक्रमण दरात झपाट्याने वाढ झाल्याने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शाळा प्रशासनाला अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.शुक्रवारी दिल्लीत ३२५ कोरोनाबाधित आढळले होते. शनिवारी ही संख्या ३६६ वर पोहोचली आहे. शुक्रवारचा संक्रमणाचा दर २.३९ टक्के होता. तो शनिवारी ३.९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. अचानकपणे वाढलेल्या या दरामुळे प्रशासनाने खबरदारीचे उपाय करण्यास सुरुवात केली आहे.
अशातच, मुंबईत कोरोनाचे दोन नवीन विषाणू आढळले आहेत. ‘कापा’ आणि ‘एक्सई’ उपप्रकाराचे रुग्ण मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे, नागरिकांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे.