विरारमध्ये घरात झालेल्या चोरीनंतर 63 वर्षीय गृहिणीची हत्त्या

विरार पश्चिमेला एका सोसायटीमध्ये सायंकाळच्या वेळी एका गृहिणीची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विरार पश्चिम येथील ‘ग्रीष्म सोसायटी’त तळ मजल्यावर मनोहर डोंबळ त्यांच्या पत्नी मनीषा डोंबळ आणि त्यांची पुतणी निशा राहत होते. मनोहर मुंबईतील एका हॉटेल मधून निवृत्त झाले होते, आणि विरार मध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते. तर त्यांची 63 वर्षीय पत्नी मनीषा गृहिणी होत्या. निशा कॉलेज मध्ये शिकत आहे.
काय घडलं नेमकं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मनोहर आपल्या कामावर गेले होते.
निशा कॉलेज मध्ये गेली होती.
सायंकाळी 4 च्या दरम्यान मनीषा घरात असताना कुणी अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून चोरी केली.
मनीषा यांच्या गळ्यावर चाकूने हल्ला करून पळ काढला.
मनोहर आणि निशा संध्याकाळी घरी आले असता घर उघडल्यावर सारा प्रकार उघडकीस आला.
यावेळी घरातील समान अस्तव्यस्त पडले असून मनीषा यांचा मुतदेह स्वयंपाक घरात पडला होता.
त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी विरार ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मनोहर आणि नेहा यांच्या मदतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा विविध अंगाने तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विरार रेणुका बागडे यांनी दिली.