Thu. Jun 17th, 2021

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून कानपिचक्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे नागरिकांबरोबरच सरकारनेही दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोषारोप करण्याची ही वेळ नसल्याचे म्हटले आहे.

पहिल्या लाटेनंतर सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक गाफील राहिल्याने सध्याची परिस्थिती उद्भवली आहे; पण सकारात्मकता, धैर्य, संघटित शक्तीने कोरोना संकटाचा मुकाबला करून आपण जगासमोर एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण ठेवू, असे आवाहन भागवत यांनी केले.

‘डॉक्टरांनी पहिल्या लाटेनंतर इशारा देऊनही सर्वांनी पुरेशी दक्षता बाळगली नाही. त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे. रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे; पण घाबरण्याचे कारण नाही. वज्राप्रमाणे खंबीर राहून सकारात्मकतेने या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. एकमेकांवर दोषारोप करण्याचा किंवा बोटे दाखविण्याचा हा काळ नाही’, असं मोहन भागवत म्हणाले. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये वाईट परिस्थिती होती; पण पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या कार्यालयात एक प्रबोधन वाक्य लिहिले होते- ‘निराशावादी विचारांना आणि पराभवाच्या शक्यतांना येथे थारा नाही’ असा आशय त्यातून व्यक्त होत होता, असे भागवत यांनी नमूद केले.

तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल बोलताना भागवत यांनी, ‘आपण घाबरत आहोत का? तिसरी लाट आलीच तर लाटा आदळणाऱ्या एखाद्या खडकासारखे आपण सज्ज असले पाहिजे’, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *