Tue. Jun 18th, 2019

‘शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो’

0Shares

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर शरसंधान सादले आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. ‘शेतकऱ्यांचा संताप ओळखा’ या अग्रलेखात  शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याचे सरकारला आवाहन केले आहे.

‘शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखे राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असावे हे लांच्छनास्पद असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. मराठवाडय़ात मागच्या 11 महिन्यांत 855 तर विदर्भात 743 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात 11 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले हे सरकारी आकडेच सांगतात’ असे परखड मत सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ‘कर्जमाफीत सरकारने आपली फसवणूक केली हीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना बनली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शेतकऱ्यांचा संताप आता तरी ओळखा,अन्यथा आज स्वतःला गळफास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारलाही फास लावू शकतो.’ अशा शब्दात सामनातून भाजपा सरकारला खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

नेमकं काय म्हटलंय ‘सामना’च्या अग्रलेखात

जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2018 या 11 महिन्यांच्या कालावधीत मराठवाडय़ातील 855 तर विदर्भात 743 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
चार वर्षांत महाराष्ट्रात 11 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सरकारी आकडेच सांगतात.
शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशातील सत्ता कालच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनीच उखडून फेकली
शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ,ही सरकारची घोषणा असली तरी प्रत्यक्षात उत्पादन खर्चाएवढाही भाव शेतकऱ्यांना मिळत नाही.
कर्जमाफीत सरकारने आपली फसवणूक केली हीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भावना बनली आहे.
शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्या हा दळभद्री राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही.

 

शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळू नये यासाठी सरकार नावाची यंत्रणा नेमकी काय करते आहे ? हे सरकार आपले नाही अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात का निर्माण व्हावी ? अशा प्रकारच्या प्रश्नांचा थेट बाण शिवसेनेने या अग्रलेखातून भाजपा सरकारवर मारला आहे.
देशभरातील राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमे पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे चर्वितचर्वण करण्यात आणि विश्लेषणाचे चोवीस तास कव्हरेज देण्यात मश्गूल आहेत.मात्र राजकारणाच्या या कोलाहलात शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी असलेल्या बातमीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सामनातून यावेळी करण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *