Wed. Oct 5th, 2022

‘आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती’ भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलय. सर्वच थरातून त्याच्या या बेताल विधानावर प्रचंड टीका सुरु आहे.     

वादग्रस्त विधान करण्याचा संभाजी भिडे यांचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रीयतेच्या कसोटीवर हिंदू- स्त्री पुरुष नपुंसक ठरवणाऱ्या भिडेंनी यावेळी अपत्य प्राप्तीसाठी चक्क त्याच्या शेतातला आंबा खाण्याचा सल्ला दिलाय. 

आपल्या शेतातील आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील एका सभेत ते बोलत होते.

“लग्न होऊन १५ वर्ष झालेल्यांनाही मुलं होतं नाहीत. अशा स्त्री, पुरुषांनी ही फळं खाल्ल्यास त्यांना निश्चित मुलं होतील. मी आतापर्यंत १८० हून जास्त जणांना, जोडप्यांना हे फळ खायला दिलं असून १५० पेक्षा जास्त जणांना मुलं झाली आहेत”, असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल असाही दावा त्यांनी केला आहे.

ही गोष्ट आपण फक्त आपल्या आईला सांगितली असून आता तुम्हाला सांगत आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका होण्यास सुरुवात झाली असून अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

भिडेंचं विधान हे समस्त महिला वर्गाचा अपमान करणारा असल्याच सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर सरकारच्या मदतीने भिडे असे बेताल विधान करत असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा भिडे यांना टोमणा लगावला आहे.

मात्र, राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला आहे त्यामुळे भिडेंवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी अनिसने केली आहे. 

ज्यांना मुलं झाली नाहीत, त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार. असं म्हणत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी श्री शिवप्रताप संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे यांची खिल्ली उडवली. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. 

स्वतःला शिक्षणातील गोल्ड मेडलिस्ट म्हणवणाऱ्या भिडेंनी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम केलंय. या वक्तव्याचा रिपोर्ट देऊन गुन्हा दाखल करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करणार असं ही कडू म्हणाले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.