‘समीर वानखेडे जन्मापासूनच मुस्लिम’; महापालिकेकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महापालिकेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात समीर वानखेडे हे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचे म्हटले आहे.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसेच त्यासंबंधी वानखेडेंचे जातप्रमाणपत्रही मलिकांनी सादर केले होते. याप्रकरणी आता मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल आहे. समीर वानखेडे हे जन्मापासूनच मुस्लिम असल्याचे महापालिकेने या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. पालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडे मुस्लिम असतील तर त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
ज्ञानदेव वानखेडेंनी दाव्यात काय म्हटले?
मलिक दररोज नवा आरोप करून आमची बदनामी करत आहेत. त्यामुळे आमच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आमच्या विरोधात अनेक पोस्ट केल्या जात असून आम्हाला अनेक धमक्याही येत आहेत. या सर्व गोष्टींचा आम्हाला त्रास होत आहे असे, ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात म्हटले आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या दाव्यावर मलिकांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.