मलिकांनी केलेल्या महागड्या वस्तूंच्या आरोपांवर समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

क्रुझवरील ड्रग्जपार्टीप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच समीर वानखेडे महागड्या वस्तू वापरत असून त्यांच्या वस्तूंची किंमत कोटींच्या घरात असल्याचा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. यावर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘मी महागडे कपडे वापरतो ही केवळ अफवा आहे. नवाब मलिकांनी लोखंडवाला मार्केटमध्ये जावे आणि तिथले कपड्यांचे दर माहिती करून घ्यावे. त्यांनी खरी माहिती शोधून काढावी,’ असे समीर वानखेडे यांनी सांगितले आहे. तसेच सलमान नामक एका ड्रग्ज पेडलरने माझ्या बहिणीसोबत संपर्क साधला होता. पण माझ्या बहिणेने एनसीबी प्रकरण हाताळत नसल्याचे सांगून नकार दिला. त्याच व्यक्तीच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समीर वानखेडेंनी सांगितले.
मलिकांनी वानखेडेंवर महागड्या वस्तूंवरून केले आरोप
वानखेडे कुटुंब महागड्या वस्तू वापरत असल्याचे मलिक म्हणाले. समीर वानखेडे सत्तर हजाराचे शर्ट वापरतात तर दोन लाख रुपयांचे बुट वापरतात. तसेच एक लाख रुपयांची पॅंट वानखेडे वापरतात. आणि वानखेडेंच्या मनगटावर लाखो रुपयांचे घड्याळ असते. त्यामुळे वानखेडे इतक्या महागड्या वस्तू वापरत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.