बसपाच्या संपर्क प्रमुखाला इच्छुक उमेदवाराकडून चोप!

औरंगाबाद मध्ये तिकीट वाटपावरून इच्छुक उमेदवाराने बहुजन समाज पार्टीच्या संपर्क प्रमुखाला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. मुकुंदवाडी परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
औरंगाबाद मंडळाचे संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव खंदारे यांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप शहराध्यक्ष गणेश निकाळजे यांनी केलाय. इतकंच नाही तर माझ्यासह आणखी काही जणांकडून देखील पैसे घेतले असून त्यामधील काही लोकांनी खंदारे आणि त्यांच्या चालकाला चोप दिल्याचं गणेश निकाळजे यांनी संगितलं.
औरंगाबाद फुलंब्री मतदार संघातून उमेदवारी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी मुंबईत बोलावून 10 लाखांची मागणी केली होती.
मात्र इतके पैसे नसल्याचं सांगितल्यावर 6 लाख द्यायचं ठरलं.
त्यानुसार पाहिले तीन लाख रुपये दिले होते.
त्यावेळी पुढील काम नामदेव खंदारे करतील अशी ठरलं होतं.
मात्र आता उमेदवारी दुसऱ्यालाच देत असल्याचा आरोप निकाळजे यांनी केलाय.
मात्र याबाबत आपण कुठल्याच प्रकारचे पैसे घेतलेले नसल्याचा दावा संपर्क प्रमुख नामदेव खंदारे यांनी केला.
इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न दिल्यानेच त्यांनी मारहाण केल्याचा खुलासा नामदेव खंदारे यांनी केला.