Fri. Sep 30th, 2022

“प्रेयसीला हवा तेव्हा हवं तिथे स्पर्श करायला मिळत नसेल, तर ते प्रेम कसलं?”

यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा कबीर सिंग याला प्रेक्षकांनी जेवढं डोक्यावर घेतलंय, तेवढंच समीक्षकांनी झोडपलंय. या सिनेमात महिलांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप सिनेमाच्या दिग्दर्शकावर होतोय. यासंदर्भात जेव्हा या सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळी त्याने केलेली काही वक्तव्यं ही आणखी वादग्रस्त ठरली. सध्या या वक्तव्यांविरोधात Social Media वर नेटिशन्स आक्रमक झाले आहेत.

काय म्हणाला कबीर सिंगचा दिग्दर्शक?

कबीर सिंग हा सिनेमा अर्जुन रेड्डी या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

दोन्ही सिनेमांचा लेख-दिग्दर्शक संदीप वांगाच आहे.

मात्र तेलुगूपेक्षा हिंदी व्हर्जनवर टिकेची जास्त झोड उठली.

याबद्दल घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये संदीप रेड्डी वांगा याने दिलेलं उत्तर हे आणखी वादग्रस्त ठरलंय.

‘जर तुम्ही एकमेकांना मारू शकत नसाल, आपल्या प्रेयसीला हवं तेव्हा हवं तिथे स्पर्श करू शकत नसाल, शिव्या देऊ शकत नसाल, तर मला त्यात प्रेमाची उत्कटता जाणवत नाही’, असं उत्तर संदीप रेड्डी वांगाने दिलं.

संदीप रेड्डी वांगाच्या या विधानावर सर्व थरांतून टीका होतेय. दिग्दर्शकाचा महिलांविषयीचा दृष्टिकोन अतिशय वाईट असल्याचं नेटिझन्स म्हणतायत. ही कथा त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनावरून सूचली असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे संदीप रेड्डी वांगा हा स्वतःही स्त्रियांचा अपमान करणाऱ्या मानसिकतेचा असल्याची राळ उठली आहे.

 

संदीप वांगा रेड्डीची प्रतिक्रिया

संदीप रेड्डी वांगाच्या या विधानावर टीका झाल्यावर त्याने पुन्हा आपल्या विधानाचं समर्थन केलंय. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं त्याने म्हटलंय.

प्रेमात आपल्या व्यक्तिमत्वाची वाईट बाजूही व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल आपण बोललो होत. हे जोडप्यादरम्यान असणाऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे असल्याचं विधान संदीप म्हणाला.

माझ्या सिनेमावर समीक्षकांनी खूपच नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तसंच माझ्या मुलाखतीमधील विधानांचाही चुकीचा अर्थ काढलाय, असं त्याने म्हटलं.

 

तरीही ‘कबीर सिंग’ मात्र बॉक्स ऑफिसवर अजूनही जबरदस्त कमाई करतोय. दोन आठवड्यांनंतरही या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये हवा आहे. या सिनेमाची कमाई आतापावेतो 226 कोटींच्या पार गेली आहे. शाहिद कपूरच्या संपूर्ण करीअरमधला हा सर्वांत महत्त्वाचा आणि सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.