Jaimaharashtra news

सांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त

सांगली: सांगलीमध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून २० लाखांचा खतांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगामासाठी रास्त दराने गुणवत्तापूर्ण खते उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना असतानासुद्धा खत विक्रेत्यांनी काही ठिकाणी जास्त दराने खत विक्री केल्याची तक्रार करण्यात आली होती. कृषी विभागाच्या ११ भरारी पथकांनी यासंदर्भात गुप्तपणे माहिती जमा केली. सांगली येथील जुना बुधगाव रोडवरील ग्लोबल इम्पोर्टस कार्यालयावर छापा घालून २० लाख ६० हजार रुपये किंमतीचा बनावट खत साठा जप्त केला आहे.

या खतांमध्ये मोशीअम सल्फेट, फेरस सल्फेट, सल्फर, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट या सूक्ष्मद्रव्याचे नमुने आढळून आले. कंपनीच्या शेजारी असणाऱ्या गाळ्यात अशाच प्रकारच्या खतांचा साठा आढळून आला. कृषी अधिकाऱ्यांनी या सर्व मालाचा पंचनामा केला आहे.

Exit mobile version